जळगाव मिरर । २९ जुलै २०२६
शेतीच्या मोजणीचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ४४ वर्षीय शेतकरी असून त्यांच्या गावातील गट क्रमांक ५६ मधील शेतीची मोजणी करून वाटणी करण्यासाठी त्यांनी उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव येथे अर्ज केला होता. मात्र, हे काम करून देण्यासाठी संशयित आरोपी राहुल ताराचंद कोळी (वय ३२, उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव) यांनी सुरुवातीला ₹७० हजार लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात डेटा एंट्री ऑपरेटर कल्पेश सोमनाथ पाटील (वय ३२) याचीही भूमिका समोर आली.
तक्रारदाराने याबाबत १७ जुलै २०२६ रोजी एसीबी, जळगावकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता आरोपींनी मोजणीची नोटीस पाठविण्यासाठी स्टॅम्प खर्चाच्या नावाखाली ₹६२५ तसेच कार्यालयीन खर्च, नोटीस व इतर कारणे सांगत अतिरिक्त रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर २९ जुलै २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. शेती मोजणीसाठी एकूण ₹७१,७०० लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी आरोपींनी दर्शविली. यावेळी जळगाव तालुक्यातील बसस्टँड परिसर येथे एसीबीच्या पथकाने कारवाई करत आरोपी राहुल कोळी याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणात डेटा एंट्री ऑपरेटर कल्पेश पाटील याचाही सहभाग आढळून आला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ व ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे एसीबीने सांगितले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस कर्मचारी संगीता पवार, प्रदीप पोठे, भूषण पाटील आणि मनोज पाटील यांनी सापळा यशस्वी केला. वरिष्ठ स्तरावर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेहेंदळे आणि कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.





















