जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२४
नाशिक येथील देवळाली आर्टिलरी सेंटरमधील फायरिंग रेंजवर प्रशिक्षणादरम्यान अचानक तोफगोळा फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला, तर एक अग्निवीर गंभीर जखमी झाला आहे. गोहिल विश्वराज सिंग (२०) आणि सैफत शित (२१. दोघे रा. आर्टिलरी सेंटर) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या अग्निवीरांची नावे असून, अप्पाला स्वामी (वय २०) जखमी झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली फिल्ड फायरिंग रेज आर्टिलरी सेंटर येथे गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास इंडियन फिल्ड गनद्वारे अग्निवीरांचा सराव सुरू होता. १२ तोफांवर प्रत्येकी ७ अग्निवीर गोळीबार करून लक्ष्य भेदण्याचा सराव करत होते. त्या वेळी तोफ क्र. ४ मध्ये तोफगोळा टाकला जात असताना हा गोळा अचानक सुटला. तो निर्धारित लक्ष्यापर्यंत न जाता तोफेपासून काही अंतरावरच पडला आणि त्याचा स्फोट झाला. या स्फोटात गोहिल सिंग, सैफत शित व अप्पाला स्वामी हे अग्निवीर गंभीर जखमी झाले.
या अनपेक्षित घटनेनंतर नाईक सचिन चव्हाण, आदर्श व्ही. के., नायब सुभेदार सुदेश मामेन व सुंदरराज यांनी या तिघांना तत्काळ देवळाली कॅम्प येथील एम. एच. हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमींची तपासणी करत डॉ. गोयरी यांनी गोहिल सिंग आणि सैफत शित यांना मृत घोषित केले. अप्पाला स्वामी याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.