जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२३
राज्यभर गणेश विसर्जन मिरवणुक अतिशय धुमधडाक्यात सुरु असतांना याच दिवशी रात्री पुण्यातील विमान नगर भागात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका खासगी कंपनीत मॅनेजर असलेल्या ३२ वर्षीय युवतीला रात्री लिफ्ट देण्याच्या बाहाण्याने २६ वर्षीय युवकाने गाडीवर बसवले. त्यानंतर घरी न सोडता लॉजवर नेले. त्यानंतर जे घडले ते धक्कादायक होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असलेली ३२ वर्षीय युवती ही विमाननगर भागात बॅकयार्ड कॅफेमध्ये मित्रांसह जेवण्यासाठी गेली. तिच्यासोबत तिची मैत्रीण आणि दोन मित्र होते. कॅफेमध्ये दहा हजार रुपयांचे बिल झाले. परंतु त्या तरुणीचा डेबिट कार्ड चालला नाही. यामुळे कॅफेचे व्यवस्थापक आणि कामगारांनी तिच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर तिच्याकडील दोन मोबाइल, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि डेबिट कार्ड त्यांनी जप्त केले. पैसे दिल्यावर हे परत मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी तिच्या मित्रांनी घटनास्थळावरुन पळ काढला. रात्री दीड वाजता घडलेल्या या प्रकारानंतर ती घरी जाण्यास निघाली. त्यावेळी पार्ट टाईम जॉब करणाऱ्या २६ वर्षीय दत्तात्रय खरात याने तिला आपण घरी सोडतो, असे सांगिलते.
मात्र गाडीवर बसवून घराकडे न नेता तिला खराडीतील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी तिच्या नावाने रुम घेत बलात्कार केला. हा प्रकार घडल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. युवतीने दत्तात्रय खरात विरुद्ध तक्रार दिल्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.