जळगाव मिरर / ८ एप्रिल २०२३ ।
राज्यातील काही जिल्ह्यातील हवामान सातत्याने बदल होत असून गेल्या दोन दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला आहे. पण नाशिक जिल्ह्यात या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे.
त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, चांदवड, बागलाण, निफाडच्या बहुसंख्य भागात अवकाळी पाऊस बरसला. तसेच पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात असणाऱ्या जायखेडा सह परिसरात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. किमान पंधरा मिनिटे झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
जायखेडा पाठोपाठ आसपासच्या परिसरात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. बिजोटेत वीज वितरण कंपनीचे रोहित्र वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. तर करंजाड येथील शेतकऱ्याच्या घराचे पत्रे उडाले आहेत. यामध्ये कांदा, डाळींब पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. बागलाणमध्ये करंजाड, भडाणे, बिजोटे, आखतवाडे, निताणे, पारनेर, आनंदपुर भागात तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार वादळी वारा व गारपीटीने झोडपले. आखतवाडे, पारनेर, निताणे, भडाणे, या गावातही मोठ्या प्रमाणात घरांचे, तसेच शेतीशिवारात कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.
