जळगाव मिरर | २२ जुलै २०२६
वासुदेव जोशी गोंधळी समाजाच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, यासाठी वासुदेव जोशी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून भटके-विमुक्त समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके लोटली असली तरी वासुदेव जोशी गोंधळी समाजातील अनेक कुटुंबे आजही शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि कायमस्वरूपी निवारा यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना अस्तित्वात असतानाही आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे अनेक पात्र लाभार्थींना त्याचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
समाजातील नागरिकांना जातीचे दाखले, रहिवासी दाखले व इतर आवश्यक कागदपत्रे मिळविण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून रोजगार, शिष्यवृत्ती तसेच विविध शासकीय योजनांपासूनही अनेक कुटुंबे वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच समाजातील बेघर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना शासनामार्फत जमीन उपलब्ध करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. कायमस्वरूपी निवारा उपलब्ध झाल्यास समाजातील भटकंती कमी होऊन कुटुंबांचे सामाजिक व आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, समाजाच्या वस्त्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधा निर्माण करणे, तसेच केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत सध्या वास्तव्यास असलेल्या घरजागा संबंधितांच्या नावावर करून देण्याची मागणीही करण्यात आली.
प्रमुख मागण्या
- पात्र लाभार्थ्यांना सर्व शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळावा.
- जातीचे दाखले व इतर आवश्यक कागदपत्रे सुलभपणे उपलब्ध करून द्यावीत.
- बेघर कुटुंबांना घरकुल मंजूर करून कायमस्वरूपी निवारा द्यावा.
- युवक-युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात.
- समाजाच्या वस्त्यांमध्ये आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सुविधा उभाराव्यात.
- स्वामित्व योजनेअंतर्गत वास्तव्यास असलेल्या घरजागा संबंधितांच्या नावावर करण्यात याव्यात.
या सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
यावेळी वासुदेव जोशी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनंत जोशी, उपाध्यक्ष हिरामण जोशी, सचिव रवींद्र जोशी यांच्यासह संतोष मोरकर, दगडू विधाते, प्रमोद दोरकर, प्रकाश अहिरराव, सोमनाथ दोरकर, जोगेश्वर जोशी, हरीश शिंदे, प्रदीप दोरकर, जयंत गोंधळी, जतीन पोड, निखिल विधाते, वेदांत जोशी, मयंक जोशी, आशिष गोंधळी, गोविंदा जोशी, गणेश जोशी, सचिन जोशी, विशाल जोशी, जयश जोशी, शुभम लावणकर तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















