
जगळव मिरर | १६ जून २०२६

चोपडा तालुक्यातील अडावड येथील गतवर्षीच्या हंगामात अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि यंदाच्या हंगामाकडून मोठ्या आशा बाळगलेल्या अडावद येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने पावसाच्या विलंबामुळे वाढलेल्या चिंतेतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे घडली. गोविंदा चैत्राम गंभीर (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अडावद येथील वरच्या माळी वाड्यात राहणारे गोविंदा गंभीर हे सुमारे पाच एकर कोरडवाहू शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गतवर्षी त्यांनी मक्याचे पीक घेतले होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नव्हते. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या होत्या.
यंदाच्या हंगामात चांगले उत्पादन घेऊन मागील नुकसान भरून काढण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यासाठी कर्ज काढून शेताची पूर्वतयारीही पूर्ण केली होती. मात्र, मान्सूनचे आगमन लांबल्याने पेरणी खोळंबली. वाढते कर्ज, देणी कशी फेडायची, आगामी हंगामाचे उत्पन्न कसे येईल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या चिंतेने ते सतत ग्रासले होते. या विवंचनेतून त्यांनी १५ जून रोजी पहाटे सुमारे पावणे दोन वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा मृत्यू झाला.
मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, मृतदेहाचे शवविच्छेदन चोपडा उपजिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी करण्यात आले. त्यानंतर दुपारी अडावद येथे नातेवाईक, ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची चोपडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




















