जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२४
सततच्या नापीकीसह कर्जाला कंटाळून रविंद्र कौतीक पाटील (वय ५८, रा. भादली खुर्द, ता. जळगाव) या शेतकऱ्याने दि. २६ रोजी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना दि. ३० ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. पुढील महिन्यात त्यांच्या मुलीचा विवाह होणार होता त्यापुर्वी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भादली खुर्द येथे रविंद्र पाटील हे पत्नी मुलगा आणि दोन मुली यांच्यासह वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतातील सततची नापीकी आणि सोसायटीचे कर्ज घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत होते. या कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी शनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी शेतात असताना पिकावर फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केले. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.
रविंद्र पाटील यांच्यावर चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर चार दिवसानंतर अपयशी ठरली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ किरण अगोणे हे करीत आहे. पुढच्या महिन्यात दि. २२ डिसेंबर रोजी रविंद्र पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी सुरु होती. परंतु कर्जामुळे विवंचनेत असलेल्या रविंद्र पाटील यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी छायाबाई, मुलगा खुशाल आणि दोन मुली असा परिवार आहे.