जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक भाविक बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे हनुमानाच्या दर्शनासाठी शनिवार, मंगळवर व सणाचे औचित्य साधून नेहमीच ये जा करीत असतात याच ठिकाणाहून दर्शन घेवून पतरणाऱ्या तरुणाची दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात नेहाल राजेश माचरे (वय १८, रा. कंजरवाडा) या तरुण जागीच ठार झाला. अक्षय राजेश माचरे (वय २३) आणि त्याचे नंदुरबार येथून आलेली आतेबहीण उन्नती रविचंद्र रमाईचेकर (वय १२) हे दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा फाट्याजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात नेहाल राजेश माचरे हा तरुण आई, वडील, तीन भाऊ, एक बहिणीसह वास्तव्यास आहे. त्याचे वडील हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. तर नेहाला शिक्षण घेत असतांना एका फोटो स्टुडीओमध्ये काम करुन कुटुंबाला हातभार लावित होता. दरम्यान त्याचा नेहाल हा त्याचा मोठा भाऊ अक्षय राजेश माछरे आणि त्याचे नंदुरबार येथून आलेली आतेबहीण उन्नती रविचंद्र रमाईचेकर यांच्यासोबत सोमवार दि. २२ जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. सकाळी दर्शन आटोपून परतत असताना १० वाजेच्या सुमारास मन्यारखेडा फाट्याजवळ त्यांची दुचाकी घसरुन अपघात झाला.
समोरील वाहनाने अचानक आपले वाहन हळू केल्यामुळे दुचाकीस्वार असलेल्या अक्षयने आपली दुचाकीचा ब्रेक दाबला. त्यामुळे त्यांची दुचाकी घसरुन अपघात झाला, या अपघातात नेहाल माचरे याच्यावर काळाने झडप घालून त्याला हिरावून घेतले. तर त्याचा भाऊ आणि बहिण हे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी व पोलिसांनी धाव घेत जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी नेहाल माछरे यास वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले. तर जखमी अक्षय माछरे व उन्नती तमायचेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयत नेहालच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली. त्यावेळेला त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. यावेळी समाजबांधवांची मोठी गर्दी झाली होती.