जळगाव मिरर / ११ एप्रिल २०२३ ।
गेल्या दोन महिन्यापासून जळगाव शहरातील मुख्य बसस्थानकामध्ये अनेक महिलांच्या सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या घटनेत वाढ होत आहे. तर नुकतेच ठाणे येथील महिलेची बसस्थानकावरून २६ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन बसस्थानक येथे गर्दीचा फायदा घेऊन काजल कमलेश पवार (रा. कोळसेवाडी कल्याण ईस्ट, ता. ठाणे) या प्रवासी महिलेची २६ हजार रुपये किमतीचे दागिने ठेवलेली लहान पर्स रावेर-पुणे बसमधून उतरत असताना चोरट्याने लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सोमवारी दुपारी काजल पवार या भुसावळ येथून रावेर-पुणे बसमधून जळगावला येण्यासाठी निघाल्या. १२.३० वाजता त्या नवीन बसस्थानक येथे उतरल्या. त्यानंतर रिक्षात बसत असताना त्यांना त्यांची मोठ्या पर्सची चेन उघडलेली दिसली. त्यातील दागिने ठेवलेली लहान पर्स दिसून आली नाही. पवार यांनी लागलीच बसमध्ये जाऊन पर्सचा शोध घेतला. पण, ती मिळून आली नाही. अखेर बसमधून उतरताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी लांबविल्याची खात्री त्यांना झाली. सायंकाळी त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीनुसार २५ हजार रूपये किमतीची मंगळपोत व १ हजार रूपये किमतीची सोन्याची नथ असा एकूण २६ हजार रूपये किमतीचे दागिने लांबविल्याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
