जळगाव मिरर | २७ मे २०२३
यावल तालुक्यातील हिंगोणा शिवारातील एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी एका ३३ वर्षीय तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याची कबुली देखील आरोपीने दिली असली तरी त्या महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही, त्यामुळे पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे आव्हान आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणा शिवारात एका विहिरीमध्ये दि.८ रोजी कुजलेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हातावर ‘सखाराम सुभाष’, असे गोंदलेले होते. याप्रकरणी पोलिसांत प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. दरम्यान, मयत महिलेसोबत खुमसिंग बारेला याला पाहिल्याची माहिती मिळाल्यावर संशयित आरोपी रावेर तालुक्यातील खिरवळ येथील खुमसिंग सरदार बारेला (वय ३३) असे असून तो सध्या मोर धरण परिसरात वास्तव्याला आहे. त्याला ताब्यात घेत पोलिस हिसका दाखवताच त्याने महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार करून विहिरीत फेकल्याचे सांगितले. ती बारेलाच्या घरी राहण्याचा हट्ट करीत होती. तिला घरी निघून जा; अन्यथा माझ्या संसाराला अडचणी येतील, असे वारंवार सांगूनही ती ऐकत नसल्याने तिला अखेर संपविल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.