जळगाव मिरर / २५ फेब्रुवारी २०२३ ।
जामनेर तालुक्यातील पहूर येथे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लांबवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पहूर पोलिसांनी वसंतनगर ता. जामनेर येथे गुरुवारी शिताफीने अटक केली आहे. वसंतनगर एका महिलेला १९ हजार सातशे किमतीचे सोने, चांदीच्या दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन युवकांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. पण, पहूर पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.
भिमाबाई प्रभाकर इंगळे (६०) यांच्याकडे बबलू अबुल मियाँ (वय ३३) व मोहमंद शहनशा मोहमंद सादीक (वय २३, रा. पचगचिया, ता. गोपालपूर, जि. भागलपूर, बिहार) यांनी पितळेची भांडी घासून देण्याची बतावणी केली. भांडे घासल्यानंतर सोने व चांदीचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगितले. इंगळे यांनी चांदीचे दागिने त्यांच्याकडे पॉलिशसाठी सोपविले. त्यांची हातचलाखी लक्षात आली याची गुप्त माहिती पहूर पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना मिळाली.
त्यानुसार उपनिरीक्षक संदीप चेडे, विनय सानप, किरण शिंपी, प्रवीण चौधरी, अरूण पाटील, दिनेश मारडवरकर, राहुल जोहरे, जिजाबराव कोकणे, गोपाल गायकवाड व अनिल राठोड या पथकाने गावात धाव घेऊन संबंधीत युवकांची चौकशी केली. ताब्यात घेऊन पहूर पोलिस स्टेशनमध्ये आणल्यावर त्यांच्या ताब्यातून १९ हजार ७०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने व पॉलिश करण्याचे साहित्य ताब्यात घेतले. भिमाबाई इंगळे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस हवलदार किरण शिंपी तपास करत आहेत.