
जळगाव मिरर | १३ मे २०२६
भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात भानखेडा येथील ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भानखेडा येथील रहिवासी ज्ञानेश्वर चिंधू सोनवणे (वय ३०) हे चालक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेदरम्यान ज्ञानेश्वर सोनवणे हे दुचाकी (एमएच १९, ईजे ३४४७) ने साकेगाव येथून भानखेडा येथे मजूर मित्रांचे जेवणाचे डबे आणण्यासाठी जात होते. दरम्यान, रस्त्यावर भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेनंतर ज्ञानेश्वर सोनवणे हे दुचाकीसह रस्त्यालगत असलेल्या पुलावर आदळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने त्यांना भुसावळच्या उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ तालुका पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री ८ वाजता भानखेडा येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पो. नि. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. दरम्यान, या मार्गावरील तापी नदी पात्रातून अवैध वाळू, माती व मुरूम वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरची सतत ये-जा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अशाच एका भरधाव वाहनामुळे हा अपघात घडल्याचा संशयही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मयत ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुले, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





















