जळगाव मिरर | १२ जुलै २०२४
कुलरमध्ये पाणी टाकत असतांना विजेच्या धक्का लागल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील अजंदे येथे ११ रोजी घडली. या बाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील अजंदे येथील लक्ष्मण संतोष पाटील (वय ३०) हा आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास राहत्या घरी कुलर बंद करून त्यात हंडयाने पाणी टाकत होता. याच वेळी विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत जीवन बिरपन याने रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीया वसावे करत आहेत. दरम्यान, लक्ष्मण पाटील यास शॉक लागल्यानंतर तो गंभीर स्थितीत होता. नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यास त्वरीत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध नव्हते. २० मिनिटांनंतर वैद्यकीय अधिकारी आल्यावर तपासणी केली असता त्यांनी लक्ष्मण मयत झाल्याचे सांगितले.
तर लक्ष्मणवर वेळीच उपचार झाले असते तर त्याचे प्राण वाचले असते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे लक्ष्मणचा मृत्यू झाल्याचा ग्रामपंचायत सदस्य जयेश राजू बिरपन यांनी आरोप केला आहे. मयत लक्ष्मण याला चार बहिणी असून लक्ष्मण हा त्यांचा सर्वात लहान व एकुलता एक भाऊ होता. बहिणींचे लग्न झालेली आहेत. तर लग्न होण्याआधिच एकटा भाऊ मयत झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.