जळगाव मिरर | १ ऑक्टोबर २०२४
पुढे चालत असलेल्या मालवाहू अॅपेरिक्षेवर मागून येणाऱ्या दुचाकीस्वार जोरदार धडकला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि. ३० रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास काशीनाथ चौफुलीजवळ एचडीएफसी बँकेसमोर घडली. विजय मगन पाटील (वय ३९, रा. अयोध्या नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगरातील विजय पाटील हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. ढोर बाजार परिसरात त्याची पानटपरी होती, त्यावर त्याच्या कुटुंबियांचा तो उदनिर्वाह करीत होता. सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता दुचाकीने जात असतांना काशीनाथ चौफुलीजवळील एचडीएफसी बँके समोर पुढे चालणाऱ्या ऑटोरिक्षावर आदळली. या अपघातात विजय पाटील याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तात्काळ विजय पाटील याला रिक्षातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी सीएमओ यांनी तपासणी करीत विजय पाटील याला मयत घोषीत केले. यावेळी त्यांच्या भावाने एकच आक्रोश केला. त्याच्या पश्चात वडील, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अपघातात विजय पाटील याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, त्याच्या नातेवाईकांसह मित्रांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी उपस्थितांकडून हळहळ देखील व्यक्त केली जात होती.