जळगाव मिरर | १३ जुलै २०२४
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत भुसावळ-खंडवा या दरम्यान ‘मीटरगेज रूपांतरा’सह इतर कामे करण्यात येणार आहे. यासाठी १४ ते २२ जुलै दरम्यान भुसावळमार्गे धावणाऱ्या इटारसी, कटनीसह १२ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ-खंडवा विभागातील मीटरगेजचे रूपांतर आणि खंडवा यार्डात प्री-एनआय आणि एनआय काम केले जात आहे. या कामाचा परिणाम म्हणून काही प्रवासी गाड्यांच्या संचालनावर परिणाम होणार आहे. भुसावळ-खंडवा दरम्यान काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांच्या संचलनात गती येईल. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यामुळे १४ ते २२ जुलैपर्यंत भुसावळमार्गे धावणाऱ्या १२ एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ येथून १४ ते २२ जुलै दरम्यान सुटणारी रेल्वे क्र. १९१९५ भुसावळ-इटारसी एक्स्प्रेस, क्र. १९११६ इटारसी-भुसावळ एक्स्प्रेस तसेच भुसावळ-कटनी व इतर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे मध्य रेल्वेने कळविले आहे.
‘आषाढी’ निमित्त भुसावळहून पंढरपूर विशेष रेल्वे
जळगाव व बुलडाणा जिल्ह्यांतील वारकरी बांधवांसाठी ‘आषाढी एकादशी निमित्त मोफत विशेष रेल्वेचे नियोजन केले आहे. भुसावळ-पंढरपूर-भुसावळ अशी ही मोफत सेवा असणार आहे. १६ जुलै रोजी दुपारी एक वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावरून ही गाडी निघणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेत आषाढी एकादशीनिमित्त विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. ही गाडी १७ जुलै रोजी रात्री ३:३० वाजता पंढरपूरला पोहचेल, तर पंढरपूर वरून १७ जुलै रोजी रात्री १० वाजता निघेल व भुसावळला १८ जुलै रोजी दुपारी १ वाजता पोहचेल.