जळगाव मिरर | ४ सप्टेबर २०२४
कमी किंमतीत फ्लॅट मिळवून देतो, मात्र त्यासाठी कॅश स्वरुपात त्याची खरेदी करावी लागेल असे सांगितले. त्या महिलेने बँकेतून ३० लाख रुपये काढल्यानंतर ते दोघे परिचारीकेला आपल्या कारमधून नाशिकच्या दिशेने रवाना झाले. मात्र रस्त्यात त्या दोघांची नियत फिरली आणि त्यांनी कारमध्येच स्नेहलता अनंत चुंबळे (वय ६०, रा. नाशिक) यांचा गळा आवळून खून केला. मृतदेह शिरपूर तालुक्यातील सावळदा येथे तापी नदीच्या पात्रात फेकून त्याची विल्हेवाट लावल्याची घटना दि. २ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल केला असून खून करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील स्नेहलता अनंत चुंबळे या गेल्यावर्षी धरणगाव तालुक्यातील साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून सेवानिवृत्त झाल्या होत्या, दि. १७ रोजी त्या ग. स. सोसायटीच्या मिटींगसाठी जळगावात आल्या होत्या. दि. २० रोजी सायंकाळी त्यांनी पतीला फोन करुन माझे जळगावातील काम आटोपले असून मी नाशिकला येत असून रात्री तुम्ही मला घेण्यासाठी स्टेशनवर या असे सांगितले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत खेहलता यांची कुटुंबियांनी वाट बघितली मात्र त्या घरी पोहचल्याच नाही. तसेच त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो बंदच येत होता. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याच्या नातेवाईकांकडे विचापूस केली, मात्र खेहलता चुंबळे या मिळून आल्या नाही. दोन दिवसानंतर त्यांनी दि. २३ ऑगस्ट रोजी तालुका पोलिसात नेहलता चुंबळे बेपत्ता झाल्याची तालुका पोलिसात नोंद करण्यात आली होती,
स्नेहलता चुंबळे यांना नाशिक येथे प्लॅट घ्यायचा असल्याने त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपीक असलेल्या जिजाबराव पाटील याच्यासोबत बँकेत जावून त्यांनी ३० लाख रुपयांची रोकड काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार तपासधिकारी अनिल मोरे यांनी बँकेत जावून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये जिजाबराव पाटील हा स्नेहलता यांच्यासोबत असल्याचे दिसून आल्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडेच होती.
पोलिसांनी सोमवारी दुपारच्या सुमारास संशयित जिजाबराव अभिमन्यू पाटील (वय ४८, मूळ रा. खडकसीम, ता. चाळीसगाव, ह. मु. मुंदडानगर, अमळनेर) व त्याचा साथीदार विजय रंगराव निकम (रा. विचखेडा, ता. पारोळा, ह. मु. भालेराव नगर अमळनेर) यांना त्यांच्या घरुन ताब्यात घेतले. त्यांना खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देत मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून प्रत्येकी पंधरा लाख रुपयांची रोकडसह गुन्ह्यात वापरलेली जिजाबराव पाटील यांची (एमएच ०७, एएच ०१०१) क्रमांकाची कार पोलिसांनी जप्त केली.