
जळगाव मिरर / ४ नोव्हेंबर २०२२
गेल्या दोन दिवसापासून राज्याचे राजकारण जिल्ह्यात होतांना दिसत आहे. ठाकरे गटाची धरणगावात सभा झाल्यानंतर हा राजकीय वाद जळगावातून थेट पोलीस स्थानकापर्यंत वाद गेला होता. त्यानंतर शरद कोळी यांनी धरणगावात केलेल्या भाषणामुळे त्यांना पोलीस विभागाने नोटीस बजावून ताब्यात घेणार होते. तर आज मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सभेची जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे गटाचे नेत्यांसह कार्यकर्ते आक्रमक होत सभा होणारच असा पवित्रा घेतल्याने पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ज्या ठिकाणी थांबल्या होत्या. त्या परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता.
अंधारे म्हणाल्या, महाप्रबोधन यात्रेवरून पोलिसांचा माझ्यावर आक्षेप नाही. मी सभेत कुठल्याही आक्षेपार्ह भाषेचा वापर केला नाही. असंसदीय भाषेचा वापर केला नाही परंतु, माझ्या सभांवर बंदी घालणे अयोग्य आहे. मी ऑनलाईन सभा घेणार आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, गुलाबराव पाटील घाबरले आहेत. ते बिथरले आहेत. ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी स्वःत सांगितले की, आम्ही सभेवर बंदी घालू शकतो तसा आमचा दरारा आहे असे ते म्हणाले होते. सुषमा अंधारे म्हणाल्या, पालकमंत्री पदाचा गैरवापर करीत असून सत्तेचाही गैरवापर ते करीत आहेत. त्यांचा दरारा, त्यांची गुंडगिरी हे सगळे ते लोकांसमोर मान्य करीत आहेत परंतु, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र, या गोष्टीकडे लक्ष देत नसतील तर ते सत्तेसाठी आंधळे झाले आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मी कुणाबद्दलही सत्तेसाठी आकस बाळगणार नाही किंवा ममत्व बाळगणार नाही हे बोलले परंतु ते सत्ताधाऱ्यांची बाजू घेत आहेत, जाणीवपूर्वक विरोधकांचा आवाज दाबत आहेत.





















