
जळगाव मिरर । ५ नोव्हेबर २०२२
जिल्ह्यात काही दिवसापासून सकाळी व संध्याकाळी थंडी तर दुपारी १२ वाजेनंतर उन्हाचे चटके बसु लागत आहे. रात्री पुन्हा थंडी असा अनुभव जिल्हावासीय अनुभव घेत आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा गुलाबी थंडी हवीहवीशी वाटत असली, तरीही ती अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. त्यामुळे हिवाळ्याचा आनंद लुटायचा असेल, तर ‘फिट’ असायला हवे!
हिवाळा ऋतू खरेतर आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो. कारण थंडीत प्रचंड भूक लागते. त्यामुळे आहारही चांगला राहतो. तंदुरुस्त राहण्यासाठीचा हा ऋतू; परंतु या काळात विषाणूजन्य आजार होण्याची शक्यताही असते. शहरात वाढलेली धूळ आणि हवेतील प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते.
त्यामुळे दिवाळीनंतर सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे, अशा तक्रारी डोके वर काढतात. तर ताप येणे, श्वसनविकार, दमा, कोरडा खोकला, अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते. जळगाव जिल्ह्यात जसा कडक उन्हाळा असतो तशी तीव्र थंडीची लाटही येते. अजून लाटेला उशीर असला, तरी हवामानातील बदलांमुळे या दिवसांत शीतपेय, गार पाणी, वातानुकूलित यंत्रणेमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादूर्भाव वाढतो. हवेतील प्रदूषणामुळे घसा दुखणे, याबरोबरच अन्य श्वसनाचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी थंडीत घराबाहेर पडताना गरम कपडे वापरावेत.





















