
जळगाव मिरर । १७ डिसेंबर २०२२
राज्यात गेल्या काही दिवसापूर्वी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी मध्ये शाईफेक घटना घडली होती. त्यानंतर पाटील यांना मोठा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे तरी सुद्धा मंत्री पाटील यांनी या घटनेचा मोठा धसका घेतला असल्याचे दिसून आले.
शाईफेक घटना टाळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पिंपरीतील कार्यक्रमात तोंडला पारदर्शक मास्क परिधान करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार उमा खापरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी महापौर माई ढोरे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा आहेत. महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि बाजार उपलब्ध करून दिल्यास ते अधिक सक्षमपणे काम करतील. बचत गटांनी नागरिकांची गरज ओळखून नवे उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. बचतगटांना असे नवे प्रयोग करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असेही पाटील म्हणाले.






















