जळगाव मिरर / २९ एप्रिल २०२३ ।
राज्यभर अवकाळी पाऊस हैदोस घालत असतांना जळगाव जिल्ह्यातही दोन दिवसापासून त्याची ये जा सुरु असतांना आता जामनेर तालुक्यातील वाकोदसह परिसरात जोरदार गारपीट झाली. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवार रोजी दुपारच्या वेळी अवकाळी स्वरूपाचा जोरदार पाऊस झाला. परिणामी, काढणीला आलेली पिके नष्ट झाली आहेत. तसेच ऐन उन्हाळ्यात वाघूर नदीला पूर आला आहे.

अजिंठा लेणी डोंगररांगेत शुक्रवार रोजी जोरदार अवकाळी सरी बरसल्याने संपूर्ण अजिंठा लेणी पावसात न्हाऊन निघाली. तसेच येथून उगम स्थान असलेल्या वाघूर नदीलादेखील मोठा पूर आला आहे. लेणी परिसरातील डोंगरातूनदेखील मोठमोठे ओहळ पाझरत होते.
वरखेडी तांडा परिसरातदेखील विजेच्या जोरदार कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. येथील शेतकरी कृष्णा मगन जाधव यांच्या शेतात बांधलेली बैलजोडी सुमारे १ लाख ५५ हजारांची वीज पडून जागीच ठार झाले. धनवाट शिवारातदेखील गोठ्यावरील पत्रे उडल्याने बैलजोडी जखमी झाल्याची घटना घडली आहे




















