
जळगाव मिरर | २९ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीची राज्यात धामधूम सुरु असतांना राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नुकतेच अजित पवारांनी थेट शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 1978 मध्ये शरद पवारांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले असा निशाणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला आहे. बारामतीच्या सांगवीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले, ” 1978 साली दोन्ही कॉंग्रेसचे सरकार चांगले चालले होते. यशवंतराव चव्हाणांचा विरोध आसताना देखील शरद पवारांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले. अनेक दिग्गज नेते त्यांच्या मंत्रिमंडळात आले. यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना मानसपुत्र मानले होते, त्यांना ही भूमिका आवडली नव्हती. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर आरोप केले”, असा निशाणा अजित पवार यांनी साधला.
पुढे अजित पवार म्हणाले, ”मग मी काय गद्दारी केली. साठीच्यावर वय झाले तरी मी सगळं ऐकत आलो. वय झाल्यावर तरुणांच्या हातात कारभार दिला जातो, पण तसे झाले नाही. शरद पवारांनी राजकीय खेळी केली” असा आरोप अजित पवारांनी केला. यामुळे पवार कुटुंबात आरोप प्रत्यारोप चांगलेच वाढलेले दिसून येत आहेत. याशिवाय यावेळी अजित पवार यांनी पुन्हा बारामतीकरांना भावनिक आवाहन केले आहे. बारामतीच्या सर्व सुनांनी आता घड्याळा समोरील बटण दाबून सुन बाहेरची असते का घरची हे दाखवून द्या अशी टिप्पणी अजित पवारांनी केली आहे. तसेच पालखी महामार्ग व फलटण बारामती रस्ता भाजपने केला. पण श्रेय मात्र शरद पवार गट लाटत आहे असा आरोप अजित पवारांनी केला.






















