
जळगाव मिरर | ३० जून २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात पोलीस भरती सुरु आहे. त्यामुळे अनेक तरुण गेल्या अनेक वर्षापासून पोलीस होण्याचे स्वप्न पाहत असल्याने अनेकांनी या परीक्षेचा अर्ज भरून मैदानी चाचणी देत असतांना जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील बालेगाव येथे सुरू असलेल्या पोलिस भरती दरम्यान धावताना अमळनेर येथील तरुणाचा धाप लागून मृत्यू झाल्याची घटना २९ रोजी घडली. अक्षय मिलिंद बिऱ्हाडे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील अक्षय मिलिंद बिन्हाडे हा तरुण २७ रोजी पोलिस भरतीसाठी बालेगाव येथे गेला होता. २९ रोजी मैदानी चाचणीसाठी धावत असताना ३-४ किमीनंतर त्याला भोवळ आली, अन् तो जमिनीवर कोसळला. त्याला ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. एकुलता एक मुलगा गमविल्याने आई-वडिलांनी टाहो फोडला. अक्षय हा प्रताप महाविद्यालयात कला शाखेच्या अंतिम वर्षाला होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. धुळे येथील प्रेम ठाकरे (२९) याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. पवन शिवाजी शिंदे (२५), अभिषेक शेटे (२४), सुमित किशोर आडतकर (२३), साहिल किशोर लवण (१९) यांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर अमित गायकवाड याला उपचारानंतर डिस्चार्ज दिला आहे.





















