
जळगाव मिरर | ४ जुलै २०२४
कोल्हे हिल्स परिसरातील दुकानात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून दोन हजार ३१८ रुपयांचा पानमसाला जप्त केला. याप्रकरणी चंद्रकांत सत्यसिंग पाटील (३५, रा. न्यू लक्ष्मीनगर, कोल्हे हिल्स परिसर) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (२ जुलै) करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील यांचे सावखेडा शिवारात मे. शिवशक्ती प्रोव्हिजन्स व जनरल स्टोअर नावाचे दुकान आहे. या दुकानात पानमसाला असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पथकाने २ जुलै रोजी सायंकाळी दुकानावर छापा टाकला. याठिकाणी राज्यात प्रतिबंधित असलेला दोन हजार ३१८ रुपये किमतीचा पानमसाला जप्त करण्यात आला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चंद्रकांत सत्यसिंग पाटील या दुकानमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकों धनराज पाटील करीत आहेत





















