
जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२५
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा परिसरातून रविवारी मध्यरात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना रविवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. नेवासा फाटा कॉलेज परिसरात असलेल्या ‘कालिका फर्निचर’ या दुकानास अचानक आग लागली. दुकानाच्या मागील बाजूस राहत असलेल्या मयूर अरुण रासने यांच्या कुटुंबाला आगीने क्षणार्धात वेढले. आगीचा भडका इतका प्रचंड होता की घरातील कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
या आगीत मयूर अरुण रासने (वय 36), त्यांची पत्नी पायल (वय 30), दोन मुले — अंश (वय 11) आणि चैतन्य (वय 6), तसेच वृद्ध आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय 85) यांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतदेह अत्यंत दुर्दैवी अवस्थेत आढळून आले. दरम्यान, मयूर रासने यांचे वडील अरुण रासने आणि त्यांच्या पत्नी हे मालेगाव येथे नातेवाइकांकडे गेले असल्याने या आगीतून बचावले. त्यांच्या मुलगा, सून आणि नातवंडांचा जीव गेल्याची बातमी मिळाल्यावर त्यांच्या आक्रोशाने वातावरण हेलावून गेले.
प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुकानात लाकडी फर्निचर व इतर ज्वलनशील वस्तूंचे मोठे प्रमाण असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असले तरी, तोवर सर्व काही राख झाले होते. या घटनेमुळे नेवासा फाटा व परिसरात शोककळा पसरली आहे. शाळकरी वयातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू आणि संपूर्ण कुटुंबाची होळी झाल्याने स्थानिक नागरिक, समाजसेवक व प्रशासन हादरले आहेत. पुढील तपास पोलीस व अग्निशमन विभाग करत असून, मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदतीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.




















