
जळगाव मिरर | ५ फेब्रुवारी २०२६
शिवसेना (शिंदे गट) नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी लातूर जिल्ह्यात आले असता, कामखेड ते रेनापूर रस्त्याच्या दुरवस्थेवरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “उद्या मी मंत्री नसलो आणि माझ्याकडे असा रस्ता असेल, तर मी खुटा उपटून मारेन,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना झापले.
यावेळी बोलताना पाटील यांनी काही आमदारांवरही टीका केली. “सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेल्यांना या निवडणुकीतून फक्त पैसे कमवायचे असतात. म्हणून ते कोणाकडूनही तिकीट घेतात, पैसा वाटतात आणि निवडून येतात,” असा आरोप त्यांनी केला.
गुलाबराव पाटील म्हणाले, “लातूरमधील भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार हे दोघेही दांडगे आहेत. त्यांना फक्त पैसा कमवायचा आणि वाटायचा आहे. त्यामुळे हे दोघे एकमेकांना ‘आय लव्ह यू’ म्हणतात,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच “काँग्रेसवाल्यांचा सत्यानाश होऊ द्या,” असे विधान करत त्यांनी राजकीय टीकेची धार अधिक तीव्र केली.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बोलताना पाटील यांनी गावकऱ्यांना थेट सल्ला देत, “या रस्त्याने या भागाच्या आमदाराला पुन्हा गावात येऊ देऊ नका. आधी रस्ता दुरुस्त करा, मगच गावात या,” असे सांगितले. “या रस्त्याने प्रवास करताना प्रत्येक नागरिक त्रस्त आहे. मी उद्या मंत्री राहिलो नाही आणि माझ्याकडे असा रस्ता असेल, तर संबंधितांना मारेन, मग माझ्यावर केस झाली तरी परवा नाही,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी भाजपवरही निशाणा साधला. “शिवसेनेत कार्यकर्ते तयार होतात. ते कार्यकर्ते तयार झाले की भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष त्यांना घेऊन जातात. आम्ही मुले जन्माला घालायची आणि मुले गुबगुबीत झाली की भाजपने मांडीवर बसवून घ्यायची,” असा टोला त्यांनी भाजपला लगावला.






















