
जळगाव मिरर | ८ मार्च २०२६
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाध्यक्ष राज ठाकरे रविवारी (९ मार्च) रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार असून तेथूनच पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेला प्रारंभ करणार आहेत. मनसेची स्थापना ९ मार्च २००६ रोजी झाली होती. यानिमित्ताने पक्षाने यंदा मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा हा २० वा वर्धापनदिन आहे. या निमित्ताने १० मार्चपासून पक्षाची सदस्य नोंदणी सुरू होणार असून त्याची सुरुवात रायगडावरून केली जाणार आहे.
रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याचा तसेच ऐतिहासिक शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला पवित्र किल्ला आहे. अशा पवित्र ठिकाणी जाऊन सदस्य नोंदणीची सुरुवात करणे हे प्रेरणादायी असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत सांगितले की, सदस्य नोंदणी ही फक्त महाराष्ट्र सैनिकांपुरती मर्यादित नसून महाराष्ट्र घडविण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला या अभियानात सहभागी करून घ्यावे. सद्य परिस्थितीबाबत जनतेमध्ये असलेली नाराजी आणि महाराष्ट्रासाठी काम करण्याची भावना या मोहिमेतून दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यंदा सदस्य नोंदणी डिजिटल पद्धतीनेही करण्यात येणार आहे. तसेच फक्त पक्ष शाखांबाहेर स्टॉल लावून न थांबता बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मैदाने, बागा अशा गर्दीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी नोंदणी केंद्रे उभारावीत आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांना पक्षाशी जोडावे, असे निर्देशही राज ठाकरे यांनी दिले आहेत.
दरम्यान, मनसेचा वर्धापनदिन आणि सदस्य नोंदणी अभियानानंतर १९ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील शिवतीर्थावर मोठ्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरातील कार्यकर्ते आणि समर्थक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.





















