
जळगाव मिरर | २३ मार्च २०२६
शहरातील सत्यम पार्क परिसरात घराला कुलूप लावून सासरवाडीला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर राजेंद्र जगताप (वय ३२) हे सत्यम पार्क परिसरात कुटुंबियांसह वास्तव्यास असून शहरात पानाचे दुकान चालवितात. त्यांना भिशी लागल्याने मिळालेले १ लाख रुपये त्यांनी घरात ठेवले होते. दि. २० मार्च रोजी ते पत्नीसमवेत निवृत्तीनगर येथे सासरी गेले होते.
याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून कपाटातील १ लाख रुपयांची रोकड, १ तोळ्याची सोन्याची चैन, पेंडल, मणी, तसेच ३ ग्रॅमचे मंगळसूत्र असा एकूण १ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
सागर जगताप हे परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी, श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनी पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. संबंधित परिसर नव्याने विकसित होत असल्याने काही ठिकाणी सीसीटीव्हीची सुविधा नसल्याचे समोर आले आहे. मात्र, परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे करीत आहेत.





















