
पुणे : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या तोफा आज पुण्यात धडाडणार आहेत. एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी, पेरणी आणि विकास कामांबाबतचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दिवसभरात जाहीर सभेसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, शिवसेनेचे नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचीही संध्याकाळी कात्रज चौकात जाहीर सभा होणार आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्या राजकीय तोफा धडाडणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिंदेंचा हडपसर येथे होणार उद्यान उदघाटन कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टी, पेरणी आणि विकास कामांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते 1.20 दरम्यान फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पाची पाहणी करतील. दुपारी 2.15 ला ते श्री खंडोबा जेजुरी देवस्थान येथे जातील. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता सासवड पालखी तळ मैदानावर शिवसेना पक्षाची जाहीर सभा होणार आहे. सध्या देशातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू आहे. त्यामुळे शिंदेंची तोफ कोणावर डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.




















