
मुंबई : वृत्तसंस्था
भाजपचा वंश नेमका कोणता ? सगळे रेडिमेड आहेत. हायब्रीड आहेत. वंश विकत घेत आहेत. बंडखोरांना मोठे करणारे शिवसैनिक आजही माझ्यासोबत आहे. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत गुलाब पाहिले. आता काटे पहा, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नवीन गुलाब फुलवीन, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात व्यक्त केला.
शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर महिन्याभरापासून मातोश्रीवर शिवसैनिकांनी रीघ लावली आहे. कायद्याची लढाई सुरू आहे. न्याय देवतेवर माझा विश्वास आहे. वकील योग्य बाजू मांडत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
विरोधकांकडून आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे मी आधीच बोलो होतो. हे परवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं की शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. मात्र अशा अनेक आव्हानांना आम्ही स्वीकारले आहे आणि आमचा झेंडा रोवला आहे. राजकारणात जय-पराजय होत असतो पण पक्ष संपवण्याची भाषा कोणी करत नाही,असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे शिवसेना अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. आता शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे. आमदार आणि खासदार गेले असले तरी शिवसैनिक आपल्यासोबतच ठेवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रेही घेतली जात आहेत. तसेच आदित्य ठाकरे पाठोपाठ उद्धव ठाकरे राज्यभरात दौरे काढणार आहेत.




















