
जळगाव मिरर | १२ जून २०२६

जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोर उभा राहिलेला बंडखोरीचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे जळगावमधील राजकीय अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाला असून महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगाव विधान परिषद निवडणुकीत रेश्मा काळे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर पेच निर्माण झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या निवडणुकीत बंडखोरीमुळे मतविभाजनाची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून सुरू असलेल्या समन्वयाच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याचे चित्र दिसून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून संपर्काबाहेर असलेल्या रेश्मा काळे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर शिंदे यांच्या सूचनेनुसार आपण महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीभोवती निर्माण झालेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रेश्मा काळे यांच्या निर्णयामुळे जळगावमधील महायुतीतील अंतर्गत मतभेद मिटल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी नाशिकमधील बंडखोरीचा प्रश्नही महायुतीने यशस्वीपणे सोडवला होता. आता जळगावमधील तिढाही सुटल्याने महायुतीच्या दोन्ही महत्त्वाच्या जागांवरील बंडखोरांना शांत करण्यात नेतृत्वाला यश मिळाले आहे.
राजकीय वर्तुळात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर महायुतीची ताकद अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे. रेश्मा काळे यांनी अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीतील समीकरणेही बदलली असून महायुतीच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तिरंगी लढतीत येणार रंगत !
जळगाव विधान परिषद निवडणुकीत आता महायुतीमधील बंड थंड झाल्यानंतर आता निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. यात महायुतीतर्फे नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीतर्फे शरद तायडे व अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात ही लढत होणार आहे. त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





















