जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२६
लग्नाचे आमिष दाखवत तब्बल तीन वर्षे २१ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात तरुणासह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील २१ वर्षीय तरुणीची आदित्य ब्रजेश वत्स याच्याशी ओळख झाली होती. दोघेही पुण्यात शिक्षण घेत असल्याने त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्यानंतर आरोपीने पीडितेला लग्नाचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने लग्नाचे आश्वासन देत वेळोवेळी तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिचा विश्वास संपादन करून विविध कारणांसाठी आर्थिक मदतही घेतली.
दरम्यान, ३० जून रोजी पल्सर दुचाकी खरेदी करण्याचे कारण सांगत आरोपीने तरुणीकडून ऑनलाइन व्यवहाराद्वारे सुमारे १ लाख १० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर १२ जुलै रोजी पीडितेने विवाहाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आदित्य ब्रजेश वत्स तसेच त्याच्या आई-वडिलांविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व तथ्ये स्पष्ट होणार असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपींची दोषी किंवा निर्दोष असल्याची बाब निश्चित होईल.




















