
मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेनेला शिंदे यांच्यासह ४० पेक्षा जास्त आमदार सोडून गेल्यानंतर ठाकरे परिवार जणू मैदानात उतरले आहे. त्यातच संजय राऊत याना ईडीने ताब्यात घेतल्यापासून शिवसेनेत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे व पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटात जात असतानाच शिवसेनेमध्ये आता उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस यांची एन्ट्री होत असल्याने शिवसेनेत एक कार्यकर्त्यांना उत्साह भरणारे वातावरण निर्माण झाले आहे. चक्क मुबईमध्ये आजचा छावा उद्याचा वाघ, असे उल्लेख असलेले होर्डिंग मुंबईत लागले आहे.
तेजस ठाकरेंची राजकारणातील सक्रिय प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आज वरळीत तेजस ठाकरे यांचे होर्डिंग लागले आहे. तेजस ठाकरे यांच्या आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्यानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर वरळीत लागले आहे. शिवसेना आमदार सुनिल शिंदे यांचे भाऊ निशिकांत शिंदे यांनी हे होर्डिंग लावले आहे. विशेष म्हणजे, वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या होर्डिंगची चर्चा रंगली आहे.




















