जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२६
जामनेर तालुक्यातील पहूर येथे घरासमोरील जागेतील सार्वजनिक बाक इतरत्र हलविण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान बाप-लेकाला कारने चिरडून ठार मारण्याच्या प्रयत्नात झाल्याची धक्कादायक घटना घडली. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कुंभारी बुद्रुक येथील शेतकरी ज्ञानेश्वर उत्तम मोरे (रा. कुंभारी बुद्रुक) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा यश ज्ञानेश्वर मोरे हा गंभीर जखमी झाला. जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील हिवरखेडा फाट्याजवळ शनिवारी (दि. २६) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारी बुद्रुक येथे घरासमोरील जागेतील बाक इतरत्र हलविण्याच्या कारणावरून ज्ञानेश्वर मोरे यांचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ज्ञानेश्वर मोरे व त्यांचा मुलगा यश मोरे हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच १९ बीटी २३०८ वरून पाहूरकडे निघाले होते. दरम्यान, त्यांच्या मागावर असलेल्या बाळू उत्तम जोशी व अन्य दोघांनी (रा. कुंभारी) कार क्रमांक एमएच १९ ईए १७६९ ने पाठलाग केला. हिवरखेडा फाट्याजवळ कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. ही धडक जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दिल्याचा आरोप आहे. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेले ज्ञानेश्वर मोरे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दुचाकी चालविणारा त्यांचा मुलगा यश मोरे हादेखील गंभीर जखमी झाला असून, प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पात्रे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक नमुने संकलित केले. पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान, घटनेतील संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी बाळू उत्तम जोशी यास ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास पाहूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पात्रे करीत आहेत. मयत ज्ञानेश्वर मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मोरे यांच्या मृत्यूमुळे कुंभारी बुद्रुक गावावर शोककळा पसरली असून, या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




















