जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२४
रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेत सुवर्णा पंडीत पाटील (वय २७, रा. शिरसोली, ता. जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास दापोरा शिवारात घडली. तरुणीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील सुवर्णा पाटील या तरुणीला आई वडिल किंवा भाऊ नाहीत. त्यामुळे ती शिरसोली येथे आपल्या बहिणीकडे राहत होती. तिच्या बहिणीचे जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारात शेत असल्याने गुरुवारी सकाळी ती गावातील काही महिलांसह शेतात आली होती. गतीमंद असलेल्या सुवर्णा ही दुपारच्या सुमारास शेताजवळ असलेल्या अप लाईनवरुन रेल्वे गेल्यानंतर रुळ ओलांडत होती. दरम्यान याच वेळी डाऊन लाईनवरुन येणाऱ्या धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला.
ही घटना दुपारी रेल्वेलाईन खंबा क्रमांक ४०६/१७ ते ४०६/ १९ दरम्यान डाऊनलाईनवर घडली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोहेकॉ अनिल फेगडे, संजय भालेराव, अनिल मोरे, धनराज पाटील, श्रीकांत बदर यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीचा मृतदेह त्यांनी खासगी वाहनात टाकून शासकीय रुग्णालयात हलविला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.