जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२४
यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे एका ३० वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना ३० ऑगस्टला दुपारी २ वाजता निदर्शनास आली. चिप्स खायचे आहेत, तु तळून दे, असे त्यांनी त्यांच्या पत्नीस सांगितले आणि घरातील दुसऱ्या खोलीत जावून त्यांनी गळफास घेतला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील रहिवासी स्वप्निल देविदास चौधरी (वय ३०) हे शुक्रवारी आपल्या घरीच होते. या वेळी त्यांनी पत्नी पूनम चौधरी यांना तू माझ्यासाठी चिप्स तळून दे, मला चिप्स खायचे आहेत, असे सांगितले. त्यानंतर त्यांची पत्नी पूनम या किचनमध्ये जाऊन चिप्स तळत होत्या. त्याचवेळी स्वप्निल याने आपल्या राहत्या घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन साडीच्या साह्याने गळफास घेतला. चिप्स तळल्यानंतर त्यांची पत्नी पूनम ही पतीला चिप्स द्यायला गेली, तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आला. हे पाहताच पूनम चौधरी यांनी मोठा आक्रोश केला. त्यामुळे आजूबाजुच्या नागरिक धावून आले. त्यानंतर स्वप्निल चौधरी यांना खाली उतरवून तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी सदस्य अरूण पाटील, भरत चौधरी, सेनेचे मुन्ना पाटील यांनी रूग्णालयात धाव घेत मयताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विजय चौधरी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.