जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२४
यावल शहरातील बोरावल गेट भागातील रहिवासी एका ४५ वर्षीय महिलेला रविवारी सकाळी राहत्या घरात सर्पदंश झाला. महिलेला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला. तेव्हा महिलेच्या नातलगांनी मृतदेह परत यावल रुग्णालयात आणला आणि या ठिकाणी उपचारात दिरंगाई केल्याचा आरोप त्यांनी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला. रूग्णालयात नागरिकांची गर्दी झाल्याने पोलिसांनी या ठिकाणी येऊन रुग्णांच्या नातेवाईकांची समजूत काढली या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात बोरवल गेट आहे. बोरावल गेट भागात गाडगे नगरमध्ये निर्मला शंकर पवार (वय ४५) ही महिला कुटुंबासह राहते. ही महिला रविवारी सकाळी घरात घरकाम करत होती. दरम्यान तिच्या उजव्या पायाला अचानक सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच या महिलेला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, डॉ. प्रशांत जावळे, डॉ. कोमल नरवाडे-पाटील यांनी प्रथम उपचार सुरू केले. उपचार सुरू असतांना अचानक महिलेची प्रकृती बिघडली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना येथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला व जळगाव येथे नेत असतानांच रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला.
तेव्हा नातेवाईकांनी तो मृतदेह तेथून थेट यावल ग्रामीण रूग्णालयात आणत उपचारादरम्यान दिरंगाई केल्याचा आरोप करीत संताप व्यक्त केला. तेव्हा रुग्णालयात पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक फौजदार असलम खान, हवालदार वासुदेव मराठे, संदीप सूर्यवंशी, वसीम खान, विनोद बाविस्कर, हर्षद गवळी हे पथकासह रुग्णालयात दाखल झाले. मयत यांच्या नातलंगाची समजूत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष कामराज घारू, नरेंद्र शिंदे, गोलू माळी यांनी काढली व जमाव शांत झाला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहे.