
जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून अनेक पक्षांना नेते व पदाधिकारी धक्का देत असून आता नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे इतर पक्षांपाठोपाठ आता मनसेमध्येही नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे.
दातीर हे गेल्या अनेक वर्षापासून मनसेमध्ये कार्यरत होते. त्यांंनी शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष अशी पदे भूषवली आहे. मनसेच्या अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग राहीला आहे. ते नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, भाजप मधून मनसेत प्रवेश केलेल्या दिनकर पाटील यांना मनसेने पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे दातीर हे नाराज होते. आपल्याला उमेदवारी नाकारल्याने अखेर दातीर यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा पक्षाचे सचीव यांच्याकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले आहे.