जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२४
पिंप्राळा येथून बाजार करुन सावखेडा येथे जात असलेल्या दुचाकीस्वारांना समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रामदास बुधा सोनवणे वय २९, रा. सावखेडा, ता. जळगाव) यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर चार दिवसानंतर त्यांची मृत्यूसोबत असलेली झुंज अखेर सोमवार दि. ५ ऑगस्टरोजी सकाळी अपयशी ठरली. याप्रकरणी तालुका पोलीसात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील दीपक आत्माराम सोनवणे (वय ३२) हा तरुण गुरूवार दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता रामदास बुधा सोनवणे यांना घेवून (एमएच १९, ईएच ९८८५) क्रमांकाच्या दुचाकीने पिंप्राळा येथून सावखेडा जात होते. गावाच्या अलिकडे वासुदेव पाटील यांच्या शेतासमोर सावखेडा कडून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने येणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला समोरुन धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दीपक सोनवणे याच्या छाती व पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. तसेच रामदास सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.
अपघातात गंभीर जखमी असलेल्या रामदास सोनवणे यांच्यावर उपचार सुरू असतांना सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी दिपक सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विनोद कुंभार (पुर्ण नाव माहित नाही) याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश पाटील हे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी, चार मुले असा परिवार आहे.