जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसपासून पावसाचा हाहाकार सुरु असून आता राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. सध्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा पूरक ठरल्याने राज्यात मॉन्सून सक्रिय झाला आहे. आज राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कायम आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहेत. शनिवारपासून पावसाने आणखीच जोर पकडला असून आज रविवारी देखील राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने आज पालघर, पुणे साताऱ्यात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.
हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पालघर, पुणे, सातारामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.