जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील एका ५९ वर्षीय व्यक्तीला वीज मीटर बदलून देण्याच्या मोबदल्यात 25 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना वीज कंपनीचा वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष भागवत प्रजापती (वय ३२, आदर्श नगर कक्ष, जळगाव) यास जळगाव एसीबीने बुधवारी दुपारी लाच स्वीकारताच अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील 59 वर्षीय तक्रारदार यांच्या आईच्या नावाने घराचे जुने वीज मीटर आहे. हे वीज मीटर जुने असल्याने नादुरुस्त मीटर बदवून नवीन मीटर बसवावे लागेल व त्यासाठी 25 हजार रुपये लागतील, अशी मागणी वायरमन संतोष प्रजापती याने बुधवारी केली. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारताना आरोपी वायरमनला अटक करण्यात आली व त्याच्याविरोधात रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक अमोल वालसाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाणे, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने यशस्वी केला.