जळगाव मिरर | १७ सप्टेंबर २०२४
मोबाईल टॉवर लावलेल्या बॅटऱ्या चोरुन नेणाऱ्या चोरट्यांच्या एलसीबीच्या पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणी संशयित भिकन युवराज पाटील व धर्मेंद्र फकीरा पाटील (दोघ रा. मंगरुळ, ता. अमळनेर) यांना अटक करण्यात आली एक जण फरार आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या १२ बॅटऱ्यांसह चारचाकी मालवाहू वाहन जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. या बॅटरी चोरणाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ संदीपक पाटील, प्रवीण मांडोळे गोरख बागुल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बैसाणे, विलास गायकवाड, भारत पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाला अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील भिकन पाटील हा बॅटरी चोरीत असल्याची समजले. त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे दोन साथीदारांच्या मदतीने बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली.