जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीचा जोर वाढला असतांना महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी कागलचे भाजप नेते समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरही शरद पवार गटात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केलेले फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाणही शरद पवारांना साथ देणार आहेत. १४ ऑक्टोबर रोजी त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शरद पवारांनी फलटणमधील १४ तारखेच्या मेळाव्याची माहिती देत रामराजेंच्या प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यातच आता रामराजेंचाही तुतारी हाती घेण्याचा निर्णय झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. राजराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत अजित पवार यांचे सातारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकरही तुतारी हातात घेणार आहेत. १४ तारखेला फलटणमध्ये जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. महायुतीत आल्यानंतर देण्यात आलेली आश्वासने पाळली न गेल्याने निंबाळकर कुटुंबीय अजित पवार यांची साथ सोडली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.