जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२४
राज्याचे राजकारण सध्या सचिन वाझे यांच्या वक्तव्याने चांगलेच तापले असतांना नुकतेच महायुतीचे मंत्री गिरीश महाजन यांनी थेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ओपन चॅलेंज दिले आहे. तुमच्याकडे पेनड्राईव्ह आहे असा तुमचा दावा आहे. तुमच्याकडे असा पेनड्राईव्ह असेल तर तर तो दाखवाच असे आव्हान महाजन यांनी दिले आहे. देशमुख हे स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत असल्याचा दावा देखील महाजन यांनी केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी केला आहे. याबाबत वाझे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सर्व माहिती दिली असल्याचे वाझे यांनी माध्यमांना सांगितले. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. या संदर्भात बोलताना अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला होता.
सचिन वाझे याच्या कोणत्याच वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले असताना देखील त्याला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर आरोप लावत असल्याचे आणि देशमुख यांनी म्हटले आहे. हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. तर दोन खुनाच्या गुन्ह्यात अटक आहे. एका खुनाच्या गुन्ह्यातील अटकेत असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यासारखा व्यक्ती नसल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले होते. या संदर्भात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. त्याला मंत्री महाजन यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. आपण देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचे देखील नाव असल्याची माहिती सचिन वाजे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. याबाबत देखील गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. जर त्या पत्रात जयंत पाटील यांचे नाव असले तर या प्रकरणाची देखील चौकशी करायला हवी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माझ्याकडे पेनड्राईव्ह असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. मात्र त्यांनी अद्याप पेनड्राईव्ह समोर आणलेला नाही. या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील पेनड्राईव्ह समोर आणण्याचे आवाहन अनिल देशमुख यांना कले होते. आता गिरीश महाजन यांनी देखील अनिल देशमुख यांना आव्हान दिले आहे. अनिल देशमुख यांच्याकडे फडणवीस यांच्या विरोधात पेनड्राईव्ह असेल तर त्यांनी तो समोर आणावा, असे माझे ओपन चॅलेंज असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. केवळ स्वतःची कातडी वाचवण्यासाठीच अनिल देशमुख असा दावा करत असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.