जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२४
जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून नियमित अपघाताची मालिका सुरु असून नुकतेच दोन दिवसापूर्वी महिलेसह तरुणीला भरधाव ट्रकने धडक देत ठार केल्याची घटना ताजी असतांना आज दि.३१ ऑगस्ट शनिवार रोजी पुन्हा अपघात झाला आहे. भरधाव कारच्या जबर धडकेत एका ७८ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. जणू काही महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजबसिंग नारायण पाटील (वय ७८, रा. द्वारका नगर, जळगाव, मूळ रहिवासी ता. यावल) असे मयत वृद्धाचे नाव असून या घटनेनंतर आहुजानगर जवळ संतप्त नागरिकांनी पूर्ण महामार्ग रास्ता रोको करून जाम केल्यामुळे दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचरण करण्यात आले आहे. अजबसिंग पाटील हे द्वारका नगर येथे राहणाऱ्या मुलगीकडे राहत होते. तर त्यांचा मुलगा योगेश अजबसिंग पाटील हा त्याच्या परिवारासह गावी यावल तालुक्यात येथे शेतीकाम करण्यासाठी राहत होता. आज सकाळी १० वाजेनंतर ते द्वारका नगर स्टॉपजवळ झाडाखाली असणाऱ्या पारावर बसण्यासाठी गेले होते. रस्ता ओलांडत असताना जळगाव करून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.