जळगाव मिरर | ७ सप्टेबर २०२४
देशासह महाराष्ट्रातील तरुणाईच्या उत्साहाला शनिवारी उधाण येणार असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होईल. घरोघरी बाप्पांची स्थापना केली जाईल. अनेक दिवसांपासून बाप्पांच्या आगमनाची ओढ लागलेल्या बच्चे कंपनीमध्ये तर कमालीचा उत्साह आज दिवसभर असेल.
गणपती स्थापनेचे 3 मुहूर्त
1) सकाळी 8 ते 9.30
2) सकाळी 11.20 ते दुपारी 1.40
3) दुपारी 2 ते सायंकाळी 5.30
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सवाच्या पूर्वतयारीवर, आरास सजावटीवर अखेरचा हात शुक्रवारी फिरवण्यात आला. काही मंडळांच्या आरास सजावटी खोळंबलेल्या आहेत. उत्सवाच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत त्या पूर्ण करण्याकडे मंडळांचा कल असेल. गणेश स्थापनेसाठी यंदाच्या गणेशोत्सवातील पहिल्या दिवशी म्हणजेच चतुर्थीला दिवसभरात 3 मुहूर्त आहेत. ‘श्रीं’च्या मूर्तीची स्थापना सूर्यास्तापूर्वी करावी, असे विधान आहे. गणेश पुराणानुसार गणेशाचा जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्रात माध्यान्ह काळात म्हणजेच दिवसाच्या दुसर्या प्रहरात झाला होता. हा अत्यंत शुभ असा काळ शनिवारी 11.20 वाजेपासून सुरू होईल.
गणेश स्थापनेचा विधी
सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून मूर्तीची स्थापना करावयाची असलेल्या जागेजवळ बसा आणि गणेश स्थापनेचा संकल्प सोडा.
स्वत:समोर शुभ्र कापड अंथरून त्यावर अक्षता ठेवा.
तांब्याच्या पात्रावर कुंकू अथवा चंदनाने स्वस्तिक रेखाटा. पात्र अक्षतांवर ठेवा.
…मग या पात्रावर गणेशमूर्तीची स्थापना करा.
गणेश पुराणानुसार शक्यतो शुद्ध तुपाचा दिवा लावा.
गणपतीला अष्टगंध आणि लाल चंदनाचा टिळा लावा.
फुले आणि बेलपत्राची माळ घाला. मोदक अर्पण करा.
लवंग, वेलदोडा, कापूर, केशर, सुपारीसह काथयुक्त पान अर्पण करा.
आरती करा. नंतर मूर्तीला 21 प्रदक्षिणा घाला. दक्षिणा अर्पण करा.
हे नियम पाळा
तुळशीचे पान अर्पण करू नका.
पूजेदरम्यान काळे कपडे घालू नका.
दूर्वा आणि मोदकाशिवाय पूजा पूर्ण होत नाही, हे लक्षात असू द्या.
स्थापित मूर्तीला हलवू नये.
गणेश चतुर्थीला यंदा सुमुख नावाने एक शुभ योग तयार होत आहे. सुमुख हे गणेशाचे एक नावही आहे. समुख योगासह पारिजात, बुधादित्य आणि सर्वार्थसिद्धि हे योगही जुळून येत आहेत. योगांच्या या योगायोगामुळे शनिवारची गणेश स्थापना विशेष फलदायक असणार आहे. पौराणिक ग्रंथांच्या हिशेबाने देवाधिदेवाची अनेक रूपे आहेत. भाद्रपदात येत असलेल्या या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायक रूपात गणेशाच्या पूजेचे विधान आहे. गणेशाच्या सिद्धिविनायक या स्वरूपाची पूजा स्वत: भगवान विष्णूंनी केली होती आणि त्यांनीच या रूपाला सिद्धिविनायक हे नाव दिले होते, अशी आख्यायिका आहे. सिद्धिविनायक स्वरूपातील गणेशाची पूजा विधीनुसार अधिक संमत असली, तरी मनातील भाव हाच पूजेत सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्यांना पूजाविधीतील हे सारे सोपस्कार शक्य नाहीत, त्यांनी चौरंगावर स्वस्तिक काढून एक चमचाभर अक्षता (तांदूळ) टाकून त्यावर लाल-पिवळ्या सुताचा धागा गुंडाळून सुपारी ठेवली आणि त्यालाच गणेश मानून पूजा केली तरी ती पावते. हेही शक्य नसेल, तर श्रद्धेने केवळ एक मोदक आणि दुर्वा अर्पण करून बाप्पाला मनोभावे नमस्कार केला तरी तेही पुरेसे!