जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२४
शहरातील व्यंकटेशनगर परिसरात आई दुकानात बसलेली असतांना घरी एकटीच असलेल्या महिमा नंदलाल सनंसे (वय १९) या तरुणीने दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरिविठ्ठल नगरातील व्यंकटेश नगरात महिमा सनंसे ही तरुणी कुटुंबियांसह वास्तव्यास होती. तीच्या वडीलांचा सलूनचा व्यवसाय आहे. रविवारी दुपारच्या सुमारास महिमा ही घराजवळ असलेल्या दुकानात बसलेली होती. त्यानंतर तिची आई दुकानात आली तीने महिमा हीला घरी पाठवले. घरी एकटीच असलेल्या महिमा हीने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. काही वेळानंतर महिमाची आई घरात गेली असता, त्यांना मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. मुलीचा मृतदेह बघताच त्यांनी हंबरडा फोडीत आक्रोश केला. परिसरातील नागरिकांसह नातेवाईकांनी तात्काळ सनंसे यांच्याघराकडे धाव घेतली. त्यांनी महिमा हीला खाली उतरवून तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.
मयत महिमा हीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबियांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महिमा हीने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे तिच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला असून तिच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.