जळगाव मिरर | १९ नोव्हेबर २०२४
माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. काटोल-जलालखेड मार्गावरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींकडून ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती असून, या घटनेत अनिल देशमुख जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून देशमुख काटोल येथे येत होते. परत येताना काही व्यक्तींनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत हल्ला केला. एकाने एक मोठा दगड देशमुखांच्या गाडीच्या समोरच्या काचेवर मारला. त्यामध्ये देशमुख गंभीर जखमी झाले आहेत.
हल्ला करणारे हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप या वेळी जखमी झालेले अनिल देशमुख यांनी केला. मात्र, ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली. दरम्यान, काटोलमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही स्टंटबाजी तर नाही ना, अशी शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे.