जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२४
देशात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं उमेदवारांची पंधरावी यादी जाहीर केली आहे. भाजपने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दुरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.
याआधी भाजपच्या पूनम महाजन या येथून भाजपच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. यानंतर २०१९ मध्येही प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. यंदाही त्यांना तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता भाजपने त्यांचा पत्ता कट करत निकम यांना तिकीट दिलं आहे.