जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२४
जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून सहा दुचाकी चोरणारा सराईत चोरटा दीपक सुमऱ्या बारेला (वय २९, रा. कर्जाणा, ता. चोपडा) याच्या एलसीबीच्या पथकाने सापळा रचून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातून दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी संदीप पाटील आणि प्रवीण मांडोळे हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना संशयित दीपक बारेला हा चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याचे त्यांना समजले. यावेळी पोलिस दोन दिवसांपासून त्याच्या मागावर होते. बारेला हा त्याच्या गावी गेला होता. गावात तो ओळख लपवून राहत होता. तो गावातून पळून जात असतांना पथकाने सापळा रचून संशयित दीपक बारेला याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने जिल्ह्यातील पाचोरा, पारोळा आणि धुळे जिल्ह्यातील मोहाडी या ठिकाणाहून सहा दुचाकी लांबवल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागुल, राहुल बैसाणे, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने केली.