जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२३
शहरातील मेहरूण तलाव परिसरातून दुचाकी लांबवणाऱ्या संशयित प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडीत साबळे (रा. सुप्रिम कॉलनी) या सराईताच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून नंदुरबारसह जळगावातून चोरलेल्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील सिद्धार्थ लुल्ला यांची दुचाकी दि. २५ ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनच्या दिवशी तलाव परिसरातून चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना सुप्रीम कॉलनी परिसरात संशयित प्रशांत उर्फ चोर बाप्या हा चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्यानंतर पथकाने सुप्रीम कॉलनीमध्ये सापळा रचून संशयित प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव याला अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने नंदूरबार येथून एक तर जळगाव शहरातून तीन अशा एकूण ४ चोरी केलेल्या दुचाकी काढून दिल्या. पोलिसांनी चारही दुचाकी ताब्यात घेऊन संशयिताविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला न्यायालयात हजर केले, असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, विकास सातदिवे, छगन तायडे आणि ललित नारखेडे यांनी केले.